Tuesday, June 5, 2018


गेमाड पंथी 

                  - अभिजित कुलकर्णी 



दैनिक प्रभात...प्रसिद्धी दिनांक १ जून २०१८



ज शनिवार...रामप्रहरी आम्ही अत्यंत भावूक जाहलो आहोत. घरासमोरच्या तुळशीस पाणी वाहून, सूर्यदेवाला वंदन करून लेखणी सरसावून बैसलो आहोत. पांडुरंगा, यांसी कारणच तैसे घडले आहे...

बुधवार हा विठ्ठलाचा वार असतो, असे बोलले जाते. विठू माउलीच्या कृपेने बुधवारी मंत्रालय नामक लोकशाहीच्या मंदिरात एकेएकी आकाशवाणी जाहली. आणि अवघ्या महाराष्ट्रात चर्चेचा चिमित्कार घडला. त्यानंतर तासवडे तोल नाक्यावर भले मोठे डिजिटल फ्लेक्स उभारण्यात आले. भगवे फेटे बांधून अनेक भाविक राज्यमंत्री पदावर नियुक्त झालेल्या लाल दिव्याच्या गाडीच्या दिशेने डोळे लावून बसले. उन, वारा, पाउस याची तमा न बाळगता भर दुपारी हे वारकरी / कामकरी मोठ्या संख्येने एकत्र जमले.

महोदयांचे आगमन होताच, ‘एकच गलका जाहला, मोटी गरदी जाहली’... रेड्याच्या मुखी वेद वदवणारे ज्ञानोबा, प्रपंचावर निखारा ठेवून, पत्नी आवडाक्काच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून विठ्ठल स्मरणात गुंग होणारे तुकोबा, गोरोबा, चोखोबा, जनाई, आणि या संत मंडळीना वंदन करणारे समस्त भाविक भावूक जाहले... भरून पावले... आता आपल्या नावाने एक विद्यापीठ आकाराला येणार, हे ऐकोन समाधान पावले...   

डॉ. अतुल भोसले यांच्या राज्यमंत्री दर्जाच्या पदाच्या बातमीनंतर सातारा जिल्हा वेगळ्या अर्थाने महाराष्ट्रभर चर्चेत आहे. यामागे काय काय पुराण – भागवत शिजत होते, याचा साक्षात्कार येत्या काही दिवसात आम्हा सामान्य भक्तांना घडणार आहेच, पण सध्या पारायण घडते आहे ते ‘कृष्णा’ दरबारी घडत असल्याच्या विद्येच्या पीठाचे. संतश्रेष्ठ ज्ञानोबा, तुकोबा तसेच अन्य संत मंडळींना दैवत मानणाऱ्या शेतकरी, भाविक, पंढरीच्या वारीला जाणाऱ्या सगळ्यांना एक सुखद धक्का मिळाला आहे. ‘चला, माउलीच्या दरबारात उशीरा का होईना, पण न्याय मिळाला’ असा उद्गार समस्तांच्या मुखी नांदतो आहे...

श्री भगवतगीता उच्चस्थानी ठेवून अनेक सत्पुरुषांनी कर्माचा सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार ‘जसे कर्म कराल, तसे त्याचे फल मिळेल,’ असा याचा सारांश आहे. कर्माची मांडणी करताना ते कर्म निरीच्छ होऊन करणे अभिप्रेत आहे. ते तसे घडत असावे, असे सामान्य माणूस गृहीत धरून चालला आहे. सबब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सातारा जिल्ह्यात एक नवा पंथ सुरु केला असल्याचा आम्हाला साक्षात्कार जाहला आहे. त्याला सोयीसाठी ‘गेमाड पंथ’ म्हणू... सन २०१९ मधल्या युद्धात हा ‘गेमाड पंथ’ मोठी कामगिरी करणार असल्याचे दिसते. गेल्या काही महिन्यातल्या एकूण हालचालीवरून काही गोष्टी हळूहळू समोर येतायत... तूर्तास तरी संत विद्यापीठ होणार, ही आनंदाची बाब आहे, हे नक्की...!

धर्म आणि सत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखादा दगड जरी म्हटले, तरी त्याला स्वतःचा असा धर्म आहे. त्याला आचार्य विनोबा भावे यांनी स्वधर्म म्हटले आहे... संत मंडळीनी ग्रंथातून, आचरणातून, कीर्तन प्रवचनातून जे दिले ते शाश्वत ज्ञान. नव्या पिढीकडे बुद्धीमत्ता अफाट आहे. त्याला इमोशन कंटेंट दिला तर सारासार विवेक उत्पन्न होणार आहे. संतांच्या रचनांचा अभ्यास केला तर मानव जातीचे अंतिम ध्येय कळेल. त्यासाठी संत उरी जपावा, त्याला नामाने जागृत करावा, सर्वथा विवेक जागवावा, आत्मचिंतनी !